औरंगाबाद: उद्योगासाठी वीजपुरवठा करणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परंतु चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील ‘रेडियन्ट अॅग्रो १ व २, ग्रीव्हज’ या फिडरवरील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून दररोज तासनतास खंडित केला जात आहे. या फिडरवर जोडले गेलेले उद्योग दररोज किमान ३ ते ४ तास बंद ठेवावे लागत आहे. यामुळे विजेच्या लंपडावाने उद्योजक त्रस्त झाले आहेत.
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील वारंवार खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीतही अशीच परिस्थिती उद्भवली आहे. खंडित वीजपुरवठ्याच्या जोडीला अनियमित व अत्यल्प पाणीपुरवठ्याच्या समस्येलाही उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहेत. एमआयडीसीकडून केला जाणारा पाणीपुरवठा गेल्या २ ते ३ महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा आहे. तो देखील अनियमित केल्याने त्याचा परिणाम उद्योग व्यवसायावर होत आहे. तसेच एमआयडीसीचा पाणीपुरवठा कमी दाबाने येत असल्याने पाण्याची साठवणूक करणेही शक्य नाही. उद्योजकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मसिआने वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले आहे. औद्योगिक वसाहतीला चालना देण्यासाठी नियमित वीजपुरवठा करण्यात यावा. पाणी सोडण्यात यावे, उद्योजकांच्या समस्येकडे महावितरण कंपनी, महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी मराठवाडा असोसिएशन ऑल स्मॉल स्केल इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर (मसिआ) संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, माजीअध्यक्ष किशोर राठी, अभय हंचनाळ, मनिष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी, भगवान राऊत, किरण जगताप, विजय राठी, विक्रम डेकाटे, सुरेश खिल्लारे, कुंदन रेड्डी, दिलीप शिंदेसह आदी पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात येत आहे.












