दारूची तस्करी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बनावट विदेशी दारूची तस्करी करणार्‍या मोठ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकून आरोपींकडून विदेशी मद्याच्या ५२८ बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार, असा सुमारे १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १५ मार्चला हर्सूल भागात ही कारवाई करण्यात आली.
विक्रम उत्तम वाघ (३०, रा. सुलतानपूर खंडी, ता. छत्रपती संभाजीनगर), अनिकेत साईनाथ करारे, कपील कचरू क्षीरसागर (३२, रा. संगत रंगमहाल, शहागंज), मिलिंद मल्हारी अहिरे (२९, रा. गणेश नगर, मिसारवाडी), ओम हिरस्वामी गुंडलेकर अशी आरोपींची नावे आहेत. काही आरोपी बनावट विदेशी दारू घेऊन शहरात येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरून अधीक्षक अभिनव बालुरे, उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, स्नेहल केदारे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, जवान चेतन वानखेडे, हनुमंत स्वामी, निखिल काकडे, साईराज मोहिते, विजय पवार, संजय गायकवाड यांच्या पथकाने हर्सूल भागात सापळा रचला. संशयित वाहन (एमएच २०, जीव्ही ७७५९) येताच पोलिसांनी हर्सूल ते पिसादेवी रोडवर पकडले. तपासणी केली असता त्यात बनावट विदेशी मद्याच्या सुमारे ५२८ बाटल्या मिळून आल्या.