औरंगाबाद- मागील काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेस चा उमेदवार असणार की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिढा कायम आहे. काँग्रेसच औरंगाबाद लोकसभेची जागा लढवणार असल्यागत काँग्रेसच्या हालचाली सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता काँग्रेस मधून नेमकं कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच पक्षश्रेष्टींच्या समोर आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेस कडून एक दोन नाहीतर तब्बल बारा जण इच्छुक असल्याचे काल ( गुरुवारी ) गांधीभवन येथे झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. या उमेदवारांचा बायोडाटा स्वीकारून तो प्रदेश काँग्रेसकडे पाठवला आहे. असे काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर यांनी सांगितले आहे. विषेश म्हणजे स्वतः किरण डोणगावकर हे स्वतःही इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत.
पूर्वी जिल्हा काँग्रेचे अध्यक्ष हेच लोकसभेसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार असायचे त्यांनी नकार दिल्यास शहराध्यक्षांचा नंबर असायचा हीच प्रथा पाळण्यास हरकत नाही अशा सूचना काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या सूचनेला माजी. आ. डॉ. कल्याण काळे व देविदास लोखंडे यांनी अनुमोदन दिले. स्वतः कल्याण काळे हेही लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. तसेच शहराध्यक्ष नामदेव पवार सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहेत. त्यातच प्रा. रवींद्र बनसोड हा नवा चेहरा उमेदवारांच्या यादीत गुरुवारी दाखल झाले. गांधीभवनात त्यांचे समर्थक देखील उपस्थित होते. त्यांचे नाव पुकारताच समर्थकांनी गांधीभवनात जल्लोष केला. जिल्ह्यात एल्गार यात्रेच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस कशी वाढवली हे सांगतानाच टीकेचा सूर काढला, तेव्हा त्यांना सत्तार यांनी इशारा करून थांबल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. कुठलीही टीका टिप्पणी न करता इच्छुकांनी आपली मते मांडावीत असे सांगितले गेले. दरम्यान आमदार सुभाष झांबड यांचे नाव देखील इच्छुकांच्या यादीत होते मात्र ते या बैठीला उपस्थित राहू शकले नाहीत. ते बाहेर गावी गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगण्यात आले.
हे आहेत ते बारा जण ज्यांना लढवायची आहे लोकसभा
सुभाष झांबड, नामदेव पवार , प्रा. रवींद्र बनसोड, डॉ. कल्याण काळे, किरण डोणगावकर, प्रा मोहन देशमुख, अरुण दापेकार, मिलिंद पाटील, इब्राहिम पठाण, पृथ्वीराज पवार, युसूफ मुकाती, यांच्यासह एकूण बारा जण औरंगाबाद लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
औरंगाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही असताना काँग्रेसने आपल्या इच्छुक उमेदवारांना पुढे आणून राष्टवादीला धक्का दिला आहे. तर सतत तीन वेळा हरलेल्या काँग्रेसने औरंगाबादची जागा आमच्यासाठी सोडावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. त्यात स्वतः शरद पवार यांनी सतीश चव्हाण यांना औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस असा तिढा कायम असून या दोन पक्षात चुरस निर्माण झाली आहे. औरंगाबादची जागा आम्ही सोडणार नाही असे सत्तार नेहमीच बजावत आले आहेत.