श्रीकृष्ण जन्म कथा ऐकणे म्हणजे वैकुंठाची प्राप्ती : विष्णुगिरी महाराज

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : अधिक पुरुषोत्तम मासात श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठाची प्राप्ती होते, असे शास्त्रोक्त प्रतिपादन भागवताचार्य विष्णुगिरी महाराज काळे यांनी केले.

शहरातील बालाजी नगर, खांडसरी परिसरात भारुका परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञाच्या तृतीय दिवशी, गुरुवारी महाराजांनी श्रीकृष्ण जन्म सोहळ्याचे अत्यंत रसाळ व ओजस्वी वाणीतून वर्णन केले. मथुरेतील कंसाच्या कारागृहात श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर देवकीच्या पोटीभगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्याच क्षणी कारागृहाची बेड्या तुटून पडल्या, 

लोखंडी दरवाजे आपोआप उघडले गेले, वसुदेवांनी मुसळधार पावसात, तुफान भरलेल्या यमुना नदीला ओलांडून श्रीकृष्णाला गोकुळात नंद-यशोदेच्या घरी सुखरूप पोहोचवले. त्यावेळी शेषनागाने फणा धरून पाऊस थांबवला. या अलौकिक प्रसंगाचे निरूपण करताना महाराज म्हणाले, ज्या क्षणी श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्या क्षणी अधर्मावर धर्माचा विजय झाला.

जिथे भगवंत असतो, तिथे काळही नतमस्तक होतो. म्हणूनच श्रीकृष्ण जन्म ऐकणे म्हणजे स्वतः तील असुरी वृत्तीवर विजय मिळवणे होय. कथेच्या मध्यावर नंद उत्सव साजरा करण्यात आला. नंद घरी आनंद भयो, जय कन्हैयालाल की च्या टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण मंडप दुमदुमून गेला. महाराजांनी श्रीकृष्ण जन्माचा पाळणा म्हटल्यावर भाविकांनी भक्तिभावाने पाळणा जोजवला व बाळा जो रे म्हणून जन्मोत्सव साजरा केला. लाडू, खडीसाखर व पंचखाद्याचा महाप्रसाद वाटून भाविकांनी कृष्णा आला रे च्या जयघोषात आनंद व्यक्त केला. 

रामायणाचार्य ह.भ.प. शिवदत्त महाराज राजगुरु यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. पांडुरंग महाराज काळे, गोपाळ महाराज देशमुख, कृष्णा महाराज जाधव, काकासाहेब महाराज सुस्ते, अजय महाराज सोनवणे, कृष्णा महाराज बनसोडे, कृष्णा महाराज सोनवणे, रुद्र महाराज गायके यांच्यासह विश्वमाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, सोहळ्याचे संयोजक दिनेश भारुका परिवारासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.