नागपूर : नागपूरच्या वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर शिवारात भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या भीषण अपघातात त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश सुदाम नाईक (वय ३५), सुनीता योगेश नाईक (वय ३२) आणि गुलशन ऊर्फ गोलू योगेश नाईक (वय ४ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर तन्मय योगेश नाईक (वय ६ वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे. नाईक कुटुंब मूळचं मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा, लांजी येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने हे कुटुंब नागपूरात आलं असून ते बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ते राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता आणि दोन्ही मुलांसह दुचाकीवरून बुटीबोरीच्या दिशेने जात होते. जामठा परिसरातील गवसी-मानापूर शिवारात त्यांच्या दुचाकीच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात चौघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिंगणा पोलिसांचा ताफाही घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी एम्स रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन यांचा मृत्यू झाला होता. सहा वर्षांचा तन्मय गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.
फरार चालकाचा शोध सुरू
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रेलर हरियाणा पासिंगचा असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून तेथून पळ काढला. हिंगणा पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कामासाठी आले आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले
रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील बालाघाटहून नागपूर परिसरात आलेल्या नाईक कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. बुटीबोरी एमआयडीसीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या योगेश नाईक यांचा पत्नी आणि दोन मुलांसह प्रवास काही क्षणांतच काळाच्या पडद्याआड गेला. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन नागपूरला आलेल्या या कुटुंबावर एका भीषण अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत आई-वडिलांसह अवघ्या चार वर्षांच्या गुलशनचा मृत्यू झाला, तर त्याचा सहा वर्षांचा भाऊ तन्मय गंभीर जखमी होऊन रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. काही क्षणांपूर्वी आई-वडिलांसोबत असलेला तन्मय आता रुग्णालयात उपचार घेत असून, या हृदयद्रावक घटनेने नाईक कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.















