छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करूनच लॉकडाऊन करावे व्यापारीवर्गातून निघाले सूर

Foto
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही दिवस लॉकडाऊन करण्यासाठी विचारविनिमय करणे सुरू झाले आहे. लॉकडाऊन कमी दिवसांचा करावा जेणेकरून छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच लॉकडाऊन करताना शंभर टक्के करण्यात यावे असे सूर व्यापारी वर्गातून उमटत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज साडे सहा हजार पार गेली आहे. यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. असे असले तरी आर्थिकदृष्ट्या विचार करून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. परंतु दुसरीकडे रुग्णसंख्या प्रचंड वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी व्यापारी संघटनाकडून पुन्हा काही दिवस लॉकडाऊन करण्याला सहकार्य करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. लॉकडाऊन करताना लहान-लहान व्यापारी वर्गाचा विचार करून लॉकडाऊन कमी दिवसाचे करावे असे देखील व्यापारीवर्गाने दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले. तसेच लॉकडाऊन केल्याने खरच फायदा होईल का? याचा देखील विचार करायला हवा, तसेच लॉकडाऊन करताना शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात यावे तरच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण करता येईल. असेही त्यांनी सांगितले.
लहान व्यापारीवर्गाचा विचार करावा: जगन्नाथ काळे
एकीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यात लॉकडाऊन करण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी वर्ग सहकार्य करणार आहोत. तसेच लॉकडाऊन १०० टक्के करण्यात यावे. मात्र लहान व्यापाऱ्यांचा विचार करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात यावा. असे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. नागरिकांनी सहकार्य करायला हवे. याच काळात प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असेही ते म्हणाले.
नागरिकांना शिस्त लावावी: लक्ष्मीनारायण राठी
फक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही तर नागरिकांना शिस्त लावावी लागेल. असे मत व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले. तसेच पी-१ आणि पी-२ या फॉर्म्युला प्रमाणे विचार केला तर गर्दी वाढत चालली आहे. तसेच नागरिक यामुळे प्रतिदिन बाजारात येत आहेत. त्यामुळे हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले. 
शंभर टक्के लॉकडाऊन करा: प्रफुल्ल मालाणी
शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले पाहिजे. लॉकडाऊन कमी दिवसांचा असावा. याच महिन्यात लॉकडाऊन करण्यात यावे अशी विनंती आम्ही करत आहोत. तसेच पी-१, पी-२ या फॉर्म्युलामुळे देखील बाजारात नागरिकांची गर्दी करत आहे. असे प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन कमी कालावधीत असावे आणि शंभर टक्के असावे तरच त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले