संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, यावेळी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही आजच होण्याची शक्यता आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे.
विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जूनला संपत आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील, असे निवडणूक आयोगाने 1 मार्चलाच स्पष्ट केले आहे. आज सायंकाळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली असून, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठीच या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. सहा ते सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीची अधिसूचना मार्च अखेरीला जारी होऊ शकते. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान घेण्यात येईल. मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीसोबतच जुन्या शिरस्त्यानुसार आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका घोषित करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच लढाई पाहण्यास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजपच्या विरोधात काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपसह काँग्रेस व इतर प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त झाली असून, यामुळे निवडणूक आयोगाला मे महिन्यात समाप्त होत असलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विधानसभा निवडणूक घोषित कराव्या लागणार आहेत. यामुळेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच घोषित होतील, अशीही शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, भारत-पाक सीमेवरील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेली सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असे दिसते.