गॅस भरण्यासाठी पंपावर लागल्या रिक्षाचालकांच्या रांगाच रांगा

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांमध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली असून शहरातील अनेक पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले. सकाळपासूनच गॅस भरण्यासाठी चालक पंपांवर थांबत असले तरी तासन्‌‍‍‍तास प्रतीक्षा करूनही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

शहरातील काही प्रमुख सीएनजी पंपांवर दुपारपर्यंतच गॅस संपल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यामुळे रिक्षाचालकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरावे लागले. यात त्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया गेला. रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा अनियमित होत आहे. काही वेळा गॅस मिळतो, तर काही वेळा पूर्णपणे तुटवडा जाणवतो. परिणामी, रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. दिवसभरात दोन-तीन तास रांगेत उभं राहावं लागतं, त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि कमाई घटते. दरम्यान, काही पंपांवर गॅस संपल्याची माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे चालकांची अधिकच गैरसोय होत आहे. अनेकदा रांगेत उभे राहिल्यानंतरच गॅस संपल्याचे सांगितले जाते, अशी नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅसचा सुरळीत पुरवठा सुनिश्‍चित करावा, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. तसेच पंपांवर गॅस उपलब्धतेबाबत स्पष्ट आणि वेळेवर माहिती देण्याची व्यवस्थाही करण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या तरी गॅसचा तुटवडा कधी कमी होणार याबाबत स्पष्टता नसल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी दोघांनाही अनिश्‍चिततेचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी तर बऱ्याच पंपावर गॅस संपला आणि रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागली. त्यात काही पंपावर गॅस उपलब्ध झाला परंतु त्यातही रांगेत उभे राहावे.
 
सकाळपासून फिरतोय: रिक्षाचालक अजहर अहमद
गॅस मिळेना अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. प्रवाशांना घेऊन जावे की, गॅस भरावा असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. गॅस भरण्यासाठी सकाळपासून सगळ्या पंपावर चकरा मारल्या. बऱ्याच पंपावर गॅस मिळाला नाही. भटकंती करून सेव्हन हिल परिसरात गॅस भरण्यासाठी आलो मात्र इथेही लांबच लांब रांग पाहायला मिळाली. आता रांगेतच उभे राहून प्रतीक्षा करण्यात वेळ चालला आहे. असे रिक्षाचालक अजहर अहमद यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.