लिटर पाणी नाल्यात
शहरात तीव्र छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) पाणीटंचाईचे व दुष्काळाचे सावट असतानाच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिन्या धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जलवाहिनी स्वच्छतेचे हे पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याने सोमवारी (दि.२१) सिद्धार्थ उद्यानासमोरील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नक्षत्रवाडी येथील संतुलीत जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १५००, २००० आणि १११८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यातील १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी धुऊन त्यातून पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या २००० आणि १,११८ मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन धुण्याचे काम सुरू आहे. या पाइपलाइन दीड ते दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यात माती, कचरा साचलेला होता. त्यामुळे जलवाहिन्या धुणे गरजेचे आहे. त्यानुसार कंत्राटदार कंपनीने ज्या ठिकाणी नाले आहेत, तिथे पाइपलाइनमधून पाणी सोडून दिले आहे. महापालिकेने नागरिकांना यासंदर्भात माहिती कळविली; पण वाया जाणारे पाणी पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, जलवाहिनी धुण्यासाठी पाणी सोडण्यात आले असून जोपर्यंत पाण्याची शुद्धता योग्य प्रमाणात येत नाही, तोपर्यंत पाणी असेच सोडावे लागणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.












