अतिशय वेदनादायी : खवड्या डोंगरावरून अख्खे कुटुंब दरीत कोसळले
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वडिलांसोबत झालेल्या वादानंतर टोकाचे पाऊल उचलणाऱ्या १९ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावरून कोसळून आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुरलीधर दामोदर चांदगुडे (४८), संगीता मुरलीधर चांदगुडे (४२) आणि कुणाल मुरलीधर चांदगुडे (१९, मूळ रा. अंबड, ह. मु. झाल्टा फाटा) अशी मृतांची नावे आहेत.
वडिलांशी वाद झाल्यानंतर कुणाल रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगराच्या निसरड्या कड्यावर जाऊन उभा राहिला. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस, स्थानिक नागरिक आणि कुणालचा मित्र तेथे पोहोचले. मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र कुणाल ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण
कुणाल डोंगराच्या अगदी धोकादायक टोकावर उभा होता. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. इतक्यात, वडील मुरलीधर यांनी पोलिसांची नजर चुकवून कुणालच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी कुणालला पकडण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दोघांचाही तोल गेला. काही सेकंदांतच बाप-लेक शेकडो फूट खोल कड्यावरून खाली दगड-कपारींवर कोसळले. पती आणि एकुलत्या एक मुलाला डोळ्यांसमोर दरीत कोसळताना पाहून आई संगीता यांचा संयम सुटला. तीव्र धक्का बसलेल्या आईने क्षणाचाही विचार न करता त्याच कड्यावरून खाली उडी घेतली. काही क्षणांतच संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले.
कुणाल करीत होता 'नीट'ची तयारी
शेवटच्या क्षणी घडला थरार
कुणाल कड्याच्या अगदी टोकावर उभा असल्याने त्याला सुरक्षित मागे घेण्यासाठी वडील मुरलीधर यांनी पुढे धाव घेतली. मात्र, तोल गेल्याने आणि कुणालने हात पकडल्यामुळे दोघेही शेकडो फूट खोल दरीत कोसळले. पती आणि मुलाला डोळ्यांसमोर दरीत कोसळताना पाहून मानसिक धक्का बसलेल्या आई संगीता यांनीही क्षणाचाही विचार न करता डोंगरावरून उडी घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत तिघांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दहावीत ९२ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुणाल नीटची तयारी करीत होता. शुक्रवारी सकाळी कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात तो घराबाहेर पडला आणि तिसगाव येथील खवड्या डोंगरावर गेला. डोंगरावर पोहोचल्यानंतर कुणालने आई संगीता यांना फोन करून 'मी आत्महत्या करत आहे,' असे सांगितले. घाबरलेल्या आईने तात्काळ नातेवाईकांना कळवून खवड्या डोंगराकडे धाव घेतली. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक नागरिकही तिथे पोहोचले. सुमारे तीन तास कुणालची समजूत काढण्याचा आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू होता.
'आई, माझे ऐकून घ्यायला इथे कोणीच तयार नाही...!'
पोलीस, स्थानिक नागरिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. मुलाने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भावुक होऊन आई त्याला म्हणाली, मी आत्ताच माझे मंगळसूत्र काढून फेकून देते, तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते. असे म्हणत आईने अंगावरील मंगळसूत्र काढून खाली फेकूनही दिले. त्यानंतर कुणालनेही त्याच्याजवळील आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून खाली फेकून दिली. दोघेही हताश होऊन आपापसात बोलत होते. आईच्या भावुक विनवणीनंतरही कुणाल म्हणाला, आई, माझे ऐकून घ्यायला इथे कोणीच तयार नाही. मला आता जगण्यात अजिबात रस उरलेला नाही, माझ्या आयुष्यात आता कशालाच अर्थ उरला नाही.
Powered By: Vrudhee Solutions
















