लुब्रिझोल कंपनीची बिडकीन डीएमआयसीतून माघार

Foto

१,९१४ कोटींची गुंतवणूक लांबणीवर; १२० एकरांचा भूखंड केला रिकामा
छत्रपती संभाजीनगर, सांजवार्ता ब्युरो : बिडकीन डीएमआयसीतील महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन कंपनी लुब्रिझोलने व्यवसाय धोरणात बदल केल्याचे सांगत प्रकल्पातून माघार घेतली असून, कंपनीने १२० एकरांचा औद्योगिक भूखंड रिकामा केला आहे. या भूखंडावर भारतातील मोठे उत्पादन केंद्र उभारण्याची कंपनीची योजना होती.
या प्रकल्पासाठी लुब्रिझोलने तब्बल १,९१४ कोटी रुपयांच्या
फाईल फोटो
गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता कंपनीच्या माघारीनंतर हा भूखंड नव्या गुंतवणूकदारासाठी उपलब्ध झाला असून, ऑरिकच्या अधिकृत सूत्रांनी
या घडामोडीला दुजोरा दिला आहे.
लुब्रिझोलने रिकामा केलेल्या भूखंडासाठी जेएसडब्ल्यू कंपनीकडून स्वारस्य व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, जेएसडब्ल्यूला या भूखंडाचे अधिकृत वाटप झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जेएसडब्ल्यू आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये भूखंडाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी अंतिम निर्णय आणि अधिकृत वाटपाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
जेएसडब्ल्यूचे स्वारस्य
बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील रिकाम्या झालेल्या भूखंडाबाबत सूत्रांनी सांगितले की, भूखंड सध्या आमच्या ताब्यात आहे. त्यासंबंधी वाटप प्रक्रिया सुरू असून, उर्वरित प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जात आहे. लुब्रिझोलच्या माघारीनंतर रिकामा झालेला हा मोठा भूखंड आता नव्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाला आहे. जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या औद्योगिक समूहाकडून त्यासाठी स्वारस्य दाखविले जात असल्याने या भूखंडाच्या पुढील वाटप प्रक्रियेकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. मात्र, अधिकृत निर्णय होईपर्यंत भूखंड कोणत्या कंपनीला मिळणार, हे स्पष्ट होणार नाही.