सात कोटी कर्जाचे आमिष व्यावसायिकाला १ कोटीचा गंडा

Foto
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आधूनिक मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकेतून ७कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ९ लाख लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भामट्यांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेद्र विनोदानंद झा, रा. जयभवानगीनगर, हरिजतसिंग रूपराह, रा. तीस हजारी कोर्ट, दिल्ली, आरव अग्रवाल, रा. तीस हजारी कोर्ट, दिल्ली, अशोक सिंघल, रा. तीस हजारी कोर्ट, दिल्ली, दिपक आरोरा, रा. तीस हजारी कोर्ट, दिल्ली, मोहिनी धर्मेद्र झा, रा. जयभवानगीनगर, गणेश देशमुख रा. जवाहर कॉलनी, छपती संभाजीनगर, अमृता गणेश देशमुख (अमृता रामदास चंचोळे), रा. जवाहर कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत प्रकाश नारायणराव रोहिणीकर (वय ६०, रा. हर्सिद्धी माता मंदिरामागे, हसूल) यांनी तक्रार
दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना नवीन व्यवसायासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ७ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. हे कर्ज एका वित्तीय संस्थेमार्फत मंजूर करून देण्याचे आश्वासन देत कर्ज प्रक्रियेसाठी लॉगिन फी, विमा, जीएसटी, कमिशन आणि इतर खर्च लागतील असे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात एकूण १.०९ कोटी रुपये उकळले. तसेच जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा येथील बनावट वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र तयार करून दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. १३ ऑगस्ट २०२५ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत स्वान इंटरप्रायझेस परिसरात हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions