त्रिघाडीची भरली शंभरी अन् अयोध्येची झाली काशी
राजेंद शहापूरकर / सांजवार्ता ऑनलाईन Mar 09, 2020
न्यूटन होता ना... त्याने नाही का विज्ञानाला एक नवीन वळण दिलं , जसं आईन्स्टाईनने दिलं तसं . हा न्यूटन रोज सांयकाळी फिरायला जात असे . एकदा तो फिरायला गेला असतांना त्याच्या बाजूने एक शेतकरी चालला होता . त्याला न्यूटन माहीत असण्याचे कारण नव्हते . तो न्यूटनला म्हणाला, 'आज तुम्ही छत्री नाही आणली..!' न्यूटन म्हणाला, ' अरे आकाश तर स्वच्छ आहे . मग कशाला हवीय छत्री ?' तो शेतकरी म्हणाला , ' साहेब, असं आहे की तो बोकड त्या झुडपामध्ये मान खाली घालून खाजवायला लागला आहे...आता पाऊस येणार ..! पुढच्या १०-१५ मिनिटात पाऊस सुरू झाला..न्यूटन म्हणाला, 'आमचे ज्ञान व्यर्थ आहे .' आता हे न्यूटनचे काय ... तर , महाराष्ट्राने (मी नव्हे) बहुमताने /संख्येने निवडून दिलेल्या (आता परवाच तर अजितदादा,आपले उपमुख्यमंत्र्यानीच नाही का सांगितलं ) राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस महाआघाडी सरकारची शंभरी भरली .म्हणजे काय तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली 'जाणते' शरद पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरकर थोरातांच्या सहकार्याने अजित पवार ज्या शिताफीने सत्ता राबवित आहेत, त्याला शंभर दिवस झाले आहेत . दिवस आहेत. भरायचेच ! हां , आता वडिलांना वचन दिलेले होते, म्हणून अप्रुप !!तर केवळ भाजप सोडले असले तरी अद्यापही हिंदुत्व न सोडणारे पक्षप्रमुख मुख्यमंत्री 'ते' सोडले नसल्याचे शिवसैनिकांना समजावे म्हणून काल अयोध्येला जाऊन आले . सपत्नीक . मुख्यमंत्री असल्याने पुत्रमंत्री बरोबर असणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही . म्हणजे पूर्वी हिंदू माणूस सहकुटुंब काशी करी तसे आजकाल हिंदुत्व साबीत करण्यासाठी अयोध्या करावी लागते तर ... अर्थात अयोध्येत जाऊनही 'काशी ' करता येते ही बाब अलाहिदा ! तसे सामनावीर दोन दिवस आधीपासून तेथे फिल्डिंग लावून होतेच. त्यांच्या साथीला शहर -ए-औरंगाबादच्या छत्रपती संभाजी महाराज विमानतळारून थेट उड्डाण घेत आमचे लाडके मा.खासदार चंद्रकांत खैरे येऊन धडकले आणि त्यांच्या सेनेने लोहमार्गाने अयोध्येकडे कूच केलेली होतीच तेही पोहचले होतेच ! अशा जामानिजा घेऊन पक्षप्रमुखांनी रामलल्लाचे दर्शन घेतले ...हिंदुत्व सिद्ध केले . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी डॉ. रमेश प्रभू (विलेपार्ले मतदारसंघ) ह्यांच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रचार केला असा ठपका ठेवून त्यांचे नागरिकत्व सहा वर्षांसाठी रद्द करण्यात आले होते . हिंदुत्वासाठी एव्हडी मोठी शिक्षा भोगणारा दुसरा राजकीय नेता मला तरी आठवत नाही , अशा हिंदुहृदयसम्राट नेत्याच्या मुलाला आता हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी अयोध्या करावी लागत असेल तर हे संकेत रराजकीय जमीन निसटत चालल्याचेच आहेत .अर्थात पक्षप्रमुखांच्या 'इमेज मॅनेजर'चे काही 'राष्ट्रवादी' गणितं यामागे असतील तर ते एक पवारच जाणोत ... शेवटी एक 'वो' ही साहारा !!आता पक्षप्रमुख रामल्ललाच्या दर्शनाला गेल्यावर कोथरूडकर झालेले कोल्हापुरी चंद्रकांतदादा गप्प कसे राहणार ... ते शेवटी पक्षाध्यक्ष आहेत . हो, हो महाराष्ट्राचे पण आहेत तर पक्षप्रमुखच ना ! ,त्यांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यावर कडी केली ... रामल्लला आपल्या हृदयात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला . रामायणातील हनुमान आपणच असा दावा त्यांनी केला नाही याचेच आश्चर्य वाटते . चेहरा बघा ना सांग... 'दर्पण झूट न बोले !'घोड्यावरचे गाढव !--------------------------आपल्या प्रियांका गांधी म्हणे पेंटिंग वगैरे काढतात ...म्हणजे हे आजकालच समजलं .इतके दिवस त्यांचे नाक इंदिराजींसारखे आहे एवढेच माहीत होते . नवऱ्याला सेटल केले , जमिनी मिळवून दिल्या हे कानावर होते ...नवऱ्याला शून्यातून शिखरावर नेणाऱ्या ह्या एकमेव धर्मपत्नी असाव्यात , आमच्या सारख्याचे हाल सांगायची ही जागा नाही आणि हिम्मतही ! तर त्यांचे पेंटिंग येस बँकेच्या राणाने दोन कोटी रु. कॅश देऊन खरेदी केले म्हणे ('तुझ्यात जीव रंगला' मधील राणाच जणू ) घोड्यावर गाढव बसलेले हे पेंटिंग येस बँकेच्या राणा कपूरने का घेतले असावे आणि ते प्रियंकाजींनी कुणाकडे पाहून साकारले असावे ? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली नाहीत तर काय होईल हे सांगायला मी 'चांदोबा'तला वेताळ थोडाच आहे ! आता ही गोष्ट वेगळी की ,'कुछ रिस्ते दरवाजे खोल जाते है,या तो दिलके , या तो आँखोके ' ... समजलं ? मला तरी कुठे समजलं ...ते म्हणतात ना 'दिलबिल प्यारब्यार मैं क्या जानू रे ' ते उगीचच नसते !!