छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सरकारी रेशन आणि पोषण आहाराचा बेकायदेशीर साठा करून काळाबाजार करणाऱ्या संघटित टोळीविरुद्ध जिन्सी पोलिसांनी अखेर 'मोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कडक कारवाई केली आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह टोळीतील सहा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
असून, यामुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहेत.
हे प्रकरण १२ जून रोजी उघडकीस आले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, किराडपुरा भागातील रेहमानिया कॉलनी येथे असलेल्या 'एमआर फंक्शन हॉल'च्या तळघरातील गोदामात रेशनचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला होता. गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांनी
या ठिकाणी संयुक्तपणे धडक छापा टाकला. या कारवाईत गोदामातून तब्बल १७ लाख रुपये किमतीचा सरकारी गहू, तांदूळ, मका, ज्वारी आणि साखर जप्त करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये महिला व बालविकास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्याचाही समावेश होता, जो गोरगरीब महिला आणि मुलांसाठी राखीव असतो.
सरकारी धान्याची संघटित चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे अत्यंत पद्धतशीरपणे आणि संघटितरीत्या सरकारी धान्याची चोरी करून त्याचा काळाबाजार करत होते. एका गुन्हेगारी टोळीप्रमाणे हे रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात समोर आले. या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन, जिन्सी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी या टोळीवर 'मोका' लावण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सरकारी अन्नधान्याची चोरी करून गरिबांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अशा संघटित टोळ्यांचा पूर्ण बिमोड केला जाईल, असा कडक संदेश या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी दिला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions