औरंगाबाद- एमजीएम संस्थेच्या गंगा होस्टेलमध्ये १२ डिसेंबरला फिजिओथेरपीचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिचा खून झाला. त्यानंतर आठ दिवसांत मारेकऱ्याला पोलिसांनी पकडले देखील. मात्र आकांक्षांच्या मृत्यूचे दु:ख कधीही विसरता न येण्यासारखे आहे. मागील ३६ वर्षांत अशी घटना कधीच घडली नाही. पुढेही अशी घटना कधीच घडू नये यासाठी आकांक्षाचे सतत स्मरण राहावे म्हणून एमजीएमच्या नव्या होस्टेलला आकांक्षा देशमुख असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केली.
एमजीएमच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'आओ उजाला करे' या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. हा कार्य्रक्रम आकांक्षाला समर्पित करत असल्याचे आयोजकांनी कार्यक्रमाआधीच जाहीर केले होते. या कार्यक्रमास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे उपस्थित होते. कदम म्हणाले की, 'सत्य, अहिंसा आणि समता ही त्रिसूत्री महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दिली. गांधीजींच्या विचारांना तुम्हीही जीवनात उतरवा.' संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला. 'वृंदगान' कार्यक्रमात गायन, देशभक्तिपर समूहनृत्य झाले. कार्यक्रमाची सांगता 'आओ उजाला करे' हे गीत गाऊन मेणबत्त्या पेटवून झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती मागणी
डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा निषेध मनसे ने केला होता. सोबतच आकांक्षाचे नाव एखाद्या वसतिगृहाला देण्यात यावे अशी मागणी मनसे ने एमजीएम प्रशासनाला निवेदन देऊन केली होती. एमजीएमच्या या निर्णयाने मनसेच्या मागणीला यश मिळाले.