नेहमीच स्टंटबाजी, चमकोगिरी करण्यासाठी एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांच्याकडून पोलिसांवर आरोप केले जात आहेत. पोलिसांना टार्गेट करुन जून २0१८ मध्ये जलील यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर पैशांची उधळण केली होती. या प्रकारानंतरही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. आता ते गुटखा व अंमली पदार्थांची विक्री करणा-या माफियांच्या मागे जलील लागले आहेत. त्यातच ते पोलिसांवर देखील आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे पोलिस दलात त्यांच्याविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच गुरुवारी जलील स्वत: शिवशंकर कॉलनीतील गुटख्याच्या अड्ड्यावर गेले. तेथे त्यांनी पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाला पाचारण करुन छापेमारी करायला लावली.
शहरात गुटख्यांचे अड्डेच अड्डे आहेत असे म्हणत नेहमीच जलील हे आंदोलनाचा इशारा देत आहेत. पण अद्याप तरी त्यांनी एकही आंदोलन केल्याचे आठवत नाही. सर्वात जास्त नशेखोर मध्य मतदार संघात आहेत. यापुर्वी शहागंजातील एका देशी दारुच्या दुकानाची एमआयएम कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. शहागंज भागात दंगल भडकली होती. याप्रकरणी एमआयएमच्या तीन ते चार कार्यकर्त्यांना सिटीचौक पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा जलील यांनी जून २0१८ मध्ये सिटीचौक पोलिस ठाण्यासमोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पोलिसांनी पैशासाठी कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप करुन पोलिस ठाण्यासमोर पैशांची उधळण केली होती. याप्रकारामुळे पोलिस संतापले होते. तर शिवसेनेने त्यांच्या अटकेची मागणी केली होती. पण या प्रकरणात पोलिसांनी जलील यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. गेल्या जानेवारी महिन्यात पुन्हा जलील यांनी गुटखा आणि नशेच्या गोळया विक्री करणा-यांवर कारवाई करा अशी मागणी केली. १९ जानेवारी रोजी एमआयएमचा पोलिस आयुक्तालयावर मोर्चा, अशा बातम्या दैनिकातून प्रकाशित करण्यात आल्या. मात्र, हा मोर्चाच आदल्या दिवशी रद्द करण्यात आला होता.