सिल्लोड, ( प्रतिनिधी) : आमदार अब्दुल सत्तार यांनी शहरातील जय भवानीनगर येथील श्री सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळास सदिच्छा भेट देऊन उपस्थित भाविक व महिला भगिनींशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नवरात्र उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रास दांडियामध्ये सहभागी झालेल्या महिला भगिनींसाठी सोडतपद्धतीने बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये जय भवानी नगर, सिल्लोड येथील ऋतुजा अंकुश मिसाळ हिला स्कूटीचे बक्षीस लागले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते स्कूटीच्या चाव्या ऋतुजा मिसाळ हिच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी ऋतुजा चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून महिला भगिनींना आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मंडळाच्या या उपक्रमाचे आ.अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले.
अशा उत्सवांमुळे सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होण्यास मदत होते असे प्रतिपादन यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनीव्यक्तकेले. याप्रसंगी कृउबा समितीचे संचालक तथा मंडळाचे मार्गदर्शक नंदकिशोर सहारे, न.प.तील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक सुधाकर गायकवाड, विशाल जाधव, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, राजेंद्र ठोंबरे, राजु गौर, कुणाल सहारे, बाळू काकडे, गौरव सहारे, रवी पवार आदींसह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भाविक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















