औरंगाबाद – भाजप आमदार अतुल सावे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी तैनात बाऊन्सरच्या श्रीमुखात भडकावण्याची घटना घडली आहे. आमदार सावे यांना मंचावर येण्यापासून रोखल्याने सावे चिडले आणि त्यांनी थेट बाऊन्सरच्याच श्रीमुखात भडकावली. ही घटना सिडको एन-३ येथील गरबा मैदानावर आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मंगळवारी सकाळी घडली आहे.
असे काय घडले की
आमदार अतुल सावे भडकले
औरंगाबाद पुर्व
मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी दिवाळीनिमित्त्त सिडकोतील एन-३
परिसरातील गरबा मैदानावर दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी
प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर, गायक सौरभ दफतरदार यांच्या गीतांचा कार्यकम आयोजित
करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर केतकीसोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्या
चाहत्यांची एकच झुंबड उडाली. गर्दीला आवरणे सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सरलाही शक्य
होत नव्हते. त्याचवेळी आमदार सावे मंचावर येत होते. बाऊन्सरचा धक्का आमदार सावेंना लागला. आपल्याच कार्यक्रमात
आपल्याला मंचावर येण्यापासून रोखले जात असल्याने आमदार सावे भडकले आणि त्यांनी
बाऊन्सरला शिवीगाळ करत थेट त्याच्या श्रीमुखात भडकावली.
उंचपुऱ्या बॉडीबिल्डर बाऊन्सरच्या श्रीमुखात भडाकवण्याच्या या घटनेने संपूर्ण मंचावर शांतता पसरली. आमदार सावेंचा हा रुद्रावतार पाहून तरुणाईही अवाक् झाली. दिवाळी पहाटलाच बाऊन्सरला दिवाळी फराळ मिळाल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती.













