मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अध्यक्ष कोण ? अतुल सावे आणि नंदकुमार घोडेले आमने - सामने

Foto
औरंगाबाद- सेना भाजपा युतीच्या पदाधिकाऱ्यांत गेल्या काही दिवसांपासून वाद विवादाचे  चित्र पाहायला मिळत आहे.
स्मार्ट सिटी बसच्या लोकार्पण सोहळ्यात याचा चांगलाच प्रत्यय आला. यानंतर आता १०० कोटीच्या रस्त्याच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून पूर्व तयारीच्या पाहणी दरम्यान सोमवारी दि.31 टी.व्ही. सेंटर चौकताच सेना-भाजपा पदाधिकाऱ्यात वाद पाहायला मिळाला. 


सेना -भाजपा पदाधिकाऱ्यात विकास कामांच्या श्रेयावरून गेल्या काही दिवसात चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळत आहे.स्मार्ट सिटी बसच्या लोकारपणापूर्वी मुख्यमंत्र्याअगोदार आदित्य ठाकरे यांची वेळ घेतल्याने या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर या बस शुभरंभाच्या कार्यक्रमात देखील सेना-भाजपा पदाधिकाऱ्यांत चांगलीच तू तू मैं मैं पाहायला मिळाली होती. आता 3 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 100 कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ होणार आहे.  या कार्यक्रमाच्या पत्रिका अद्याप तयार होणार आहेत. त्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव अध्यक्ष म्हणून निश्चित केले. यावरून या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी पाहणी दरम्यान टीव्ही सेंटर चौकात चांगलाच वाद उफाळून आला होता.


 महापौर नंदकुमार घोडेले आणि आमदार अतुल सावे आणि इतर पदाधिकारी यांच्यांत अध्यक्ष पदावरून चांगलाच वाद विकोपाला गेला होता. यावेळी मराठवाडा वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, उपमहापौर विजय औताडे, भाजप शहरजिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवाणी, गटनेता प्रमोद राठोड, मकरंद कुलकर्णी, महिला व बालकल्याण सभापती माधुरी अदवंत-देशमुख, नगरसेविका सीमा खरात, नगरसेवक मोहन मेघवाले, दिलीप थोरात, प्रशांत देसरडा हे उपस्थित होते. तर प्रशासनातील अधिकारी उपयुक्त डी.पी कुलकर्णी, जनसंपर्काधिकारी संजीव सोनार हे देखील या वेळी उपस्थित होते. वादावर तिथे तोडगा निघत नसल्याने आमदार अतुल सावे तिथून बैठकीचे कारण सांगत निघून गेले .


दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई 


१०० कोटी रुपये हे मुख्यमंत्र्यानी दिले असले तरी ते जनतेचे आहे. महापौरांना मुंबईत मुख्यमंत्र्यानी वेळ दिला नाही, त्यातही महापौर कार्यक्रम घेत आहे. पाहणीसाठी आले असताना रस्त्यात वाद न घालता बैठकीत चर्चा करून वाद मिटवावा आणि दोघांच्या श्रेयवादात न पडता दोघांनी विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, व कार्यक्रमात व्यर्थ खर्च न करता जनतेचा पैसा  मार्गी लावावा. 


जमील कादरी 

विरोधी पक्ष नेता, मनपा औरंगाबाद 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोणाला निवडायचं हे सर्वस्वी महापौरांचे अधिकार असतात. आमची कुठलीही नाराजी नाही. हा युतीचा कार्यक्रम आहे 
-किशनचंद तनवाणी

प्रोटोकॉल प्रमाणे हरिभाऊ बागडे यांचे नाव आधी असायला हवे. कारण ते विधानसभा अध्यक्ष आहेत खासदार खैरेंच पद हे संवैधानिक दृष्टीने दुसऱ्या स्थानावर येते.
- आमदार अतुल सावे

महापालिकेच्या कार्यक्रमात महापौर अध्यक्ष असतो किंवा महापौर ठरवतील तो अध्यक्ष असतो. खासदार चंद्रकांत खैरेच अध्यक्ष असणार आहेत.
-महापौर नंदकुमार घोडेले