मदतीचे दिले आश्वासन
पैठण, (प्रतिनिधी) तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यामुळे गहू, बाजरी, कांदा तसेच फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान मंगळवारी आमदार विलास भुमरे यांनी गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी आ. भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, सह मोसंबी, डाळिंब, टरबुज, चिंच, आंबा आदी फळबागांचे
मोठे नुकसान झाले असून रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिलासा आमदार विलास भुमरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












