आमदार विनायक मेटेंचे वादग्रस्त वक्तव्य – अण्णासाहेब पाटलांनी नाही तर मी केली होती मराठा आरक्षणाची पहिली मागणी

Foto

औरंगाबाद – मराठा आरक्षणाची सर्वप्रथम मागणी मीच केली असल्याचा दावा आमदार विनायक मेटेंनी केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणीच केली नव्हती असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणासोबतच समुद्रातील शिवस्मारकही फक्त माझ्यामुळे होत असल्याचा दावा आमदार मेटे यांनी केला आहे.  आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली तरच शिवसंग्राम पक्ष त्यांच्यासोबत असणार आहे, अन्यथा सर्व स्वतंत्र लढले तर आम्हालाही मैदान मोकळे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

 

शिवसंग्राम पक्षाचा ६ जानेवारी रोजी वर्धापन दिन आहे. पक्षाचा वर्धापनदिन औरंगाबादमध्ये होणार असून त्याच्या तयारीसाठी आमदार मेटे बुधवारी (ता. १४) शहरात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शिस्तीचे धडे कार्यकर्त्यांना दिले. पक्ष वाढवायचा असेल तर संघासारखे स्वयंसेवक तयार झाले पाहिजे, असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले. सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना आमदार मेटे म्हणाले, की आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती झाली तरच आम्ही त्यांच्यासोबत राहाणार आहे. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर आम्हालाही मैदान मोकळे आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची तयारीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून शिवसंग्राम लढणार हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले.

 

मराठा आरक्षणाचा मुद्दा अण्णासाहेब पाटलांनी आणला हा सर्वांचा गैरसमज- मेटे

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मीच सर्वात आधी उपस्थित केल्याचा दावा आमदार मेटेंनी केला. ते म्हणाले, अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात आधी मांडला, हा सर्वांचा गैरसमज आहे. त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे अशी मागणी करत इतर आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. गरीब, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेल त्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. मेटे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, हे फक्त मी समोर आणले होते. भाजपसोबत राहून मराठा आरक्षणाचा मुद्दाही आपणच मार्गी लावू असा दावाही त्यांनी केला.

 

समुद्रातील शिव स्मारकावरुन उडवली जात होती खिल्ली

समुद्रात शिवस्मारक बांधण्याची कल्पना मी २० वर्षांपूर्वी मांडली होती. तेव्हा माझी खिल्ली उडवली जात होती, असे आमदार मेटेंनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, २० वर्षांपूर्वी जेव्हा मी अरबी समुद्रात शिवस्मारक असावे अशी कल्पना मांडली होती, तेव्हा मीडियोसोबतच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही खिल्ली उडवली होती. मात्र मागील १० वर्षांपासून समुद्रातील स्मारकाबद्दल सर्वांचे विचार सकारात्मक होत गेले आणि भाजप सरकारने स्मारकाला हिरवा कंदिल दाखवला. भाजप सरकारला स्मारक उभे करण्यास मीच भाग पाडले, असा दावाही आमदार मेटेंनी केला.