आमदार अब्दुल सत्तार यांनी केली भाऊबीज साजरी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) राजकारणातील व्यस्त दिनक्रम, मतदारसंघासह जिल्हा, मराठवाडा आणि राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याच्या नात्यांना जपण्याची परंपरा आमदार अब्दुल सत्तार यांनी यंदाही कायम ठेवली.

सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे त्यांनी आपल्या मानलेल्या बहिणीच्या निवासस्थानी भेट देत सालाबादप्रमाणे भाऊबीज सण मोठ्या आपुलकीने साजरा केला. गेल्या वर्षांपासून २८ सुरू असलेली ही परंपरा यंदाही तितक्याच आत्मीयतेने अनुभवायला मिळाली. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज या दोन्ही सणांना आमदार अब्दुल सत्तार आवर्जून सावखेडा येथे येऊन मानलेल्या बहिणीची भेट घेतात. राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढत त्यांनी यंदाही भाऊबीजेच्या दिवशी सावखेडा गाठले.

यावेळी मानलेल्या बहिणी भागीरथीबाई धनजी पा. गोंगे यांनी भावाचे औक्षण करून त्यांना रुमाल, टोपी आणि कपड्यांची भेट दिली. तर आमदार अब्दुल सत्तार यांनीही बहिणीला साडी भेट देत भाऊबीजेचा सण साजरा केला. यावेळी गोंगे परिवारातील सदस्यांशी संवाद साधत त्यांना दीपावली, पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सर्व राजकीय प्रोटोकॉल आणि औपचारिकता बाजूला ठेवत एका भावाप्रमाणे बहिणीच्या घरी उपस्थिती लावली. कोणताही राजकीय बडेजाव न करता साधेपणाने आणि तितक्याच जिव्हाळ्याने साजऱ्या झालेल्या या भाऊबीजेने उपस्थितांची मने जिंकली.

रक्ताचे नाते नसतानाही गेल्या २८ वर्षांपासून जपला गेलेला हा स्नेहबंध नात्यांची खरी श्रीमंती अधोरेखित करणारा ठरला. रक्ताच्या नात्यांइतकीच नव्हे, तर त्याही पलीकडे जाऊन माणुसकी, विश्वास आणि आपुलकीच्या बळावर नाती किती घट्ट विणली जाऊ शकतात, याचे भावस्पर्शी उदाहरण या भाऊबीजेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.