आमदार अब्दुल सत्तार यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दृष्टीने : सिल्लोड आणि सोयगाव येथील बस स्थानकांच्या अद्यावतीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.

बुधवार (दि. १२) मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध परिवहन विषयांवर सविस्तर चर्चा केली. सिल्लोड व सोयगाव येथील बस स्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन बस उपलब्ध करून देणे, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच परिवहन सेवेत अधिक सुधारणा करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. 

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर तसेच परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते. मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक प्रवास सुविधा मिळाव्यात यासाठी बस स्थानकांचे अद्यावत स्वरूपात विकास करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी नमूद केले. तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना वेळेवर व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. 

यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिल्लोड व सोयगाव बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच या कामांसाठी यावर्षी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.