मनसेचे उमेदवार ठरले; बंद लिफाफा घेऊन बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई शिवतीर्थवर पोहोचले...

Foto
मुंबई  : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व मनसेचे जागावाटप आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेकडून शनिवारपासून आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. आज सकाळपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या  नेत्यांची बैठक सुरु होती. या बैठकीनंतर मनसेचे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बंद खाकी लिफाफ्यात मनसे उमेदवारांची अंतिम यादी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आज रात्रीपासून संबंधित उमेदवारांना मनसेच्या कार्यालयातून उमेदवारीसंबंधीचे संदेश पाठवले जातील. त्यानंतर उद्या सकाळपासून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाईल. दरम्यान, आता नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोघे राज ठाकरे यांची भेट घेतील. या बैठकीत मनसे उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल.  

मनसेच्या मुंबईतील उमेदवारांची नावं आज निश्चित झाल्यानंतर त्यांना उद्यापासून पक्षाचा एबी फॉर्म दिले जातील. जेणेकरुन त्यांना प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करुन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी मिळेल. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मनसेकडून योग्य वेळेत आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. 

मनसेचा पहिला उमेदवार ठरला

दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा युतीच्या अंतिम चर्चेमध्ये मनसेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 192 वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार  निवडणूक लढवणार सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार  ठरल्याची चर्चा आहे. 2017 च्या निवडणुकीत 192 या वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना दुपारी चार वाजता भेटणार आहेत. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत.

भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता

भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे. याच संदर्भात आज रात्री शिवसेना समन्वय समितीतील नेत्यांची आज महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेच्या वाटयाला आलेल्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. निश्चित उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचं वाटप केलं जाण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.