गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतर झालेला ‘एअर स्ट्राईक’ व त्यावरून भाजपकडून सुरू असलेले राजकारण यावर मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी राज यांनी खास ‘ठाकरे’ शैलीत पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा खरपूस समाचार घेत सडकून टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर आक्रमक शैलीत कडाडून टीका केली. राम मंदिर उभारण्यात आणि दाऊद इब्राहिमला भारतात परत आणण्यात व दरवर्षी दोन कोटी रोजगारांची निर्मिती करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुलवामा हल्ल्याच्या निमित्ताने देशात युद्धज्वर पेटवून राष्ट्रप्रेमाच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा मोदी यांचा डाव आहे.पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचे राजकीय भांडवल करून राष्ट्रप्रेमाच्या आधारे आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा पंतप्रधान मोदी यांचा डाव असून, त्यासाठी पुढील दोन महिन्यांत पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवून आणला जाईल, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गेल्या 14 फेब्रुवारीला ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज म्हणाले, पुलवामातील हल्ल्यात आपले 40 हून अधिक जवान शहीद झाले. एका क्षणात चाळीस कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण देश शोकमग्न असताना पंतप्रधान मोदी हे त्यानंतर‘ अप टू डेट’ स्टायलीश वेश परिधान करून फिरत होते. हे कसले फकीर, हे तर बेफिकीर, अशी कोटीही त्यांनी केली. 27 डिसेंबरला बँकॉकमध्ये अजित डोवाल व पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली;पण ही बातमी दडवून ठेवण्यात आली. ही बैठक का झाली व त्यात नेमकी काय चर्चा झाली? हा प्रश्नही विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही का? असा सवाल त्यांनी केला. या बैठकीनंतर दोन महिन्यांत नेमका निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्ला कसा झाला? असा हल्ला घडणार आहे हे गुप्तचर यंत्रणांनी आधीच सांगितले होते. सीआरपीएफच्या जवानांना रस्ता मार्गे न नेता हवाई मार्गाने नेण्यात यावे, असेही सुचविले होते. मग हे घडल्यानंतर आम्ही प्रश्न अथवा शंका उपस्थित करायचे नाही का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
भाजप देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करील असे आपण 2015 साली वर्तवलेले भाकित खरे ठरले, असे सांगून ते म्हणाले, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांच्या आधीच मी हा अंदाज पत्रकार परिषदेत वर्तवला होता. मी ज्योतिषी नाही;पण हे काय करू शकतात याचा अंदाज मी सहजपणे व्यक्त केला होता व नंतर तसेच झाले. आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेला होता, असा सवालही राज यांनी केला. राज म्हणाले, पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर ‘एअर स्ट्राईक’ झाला. मग या सगळ्यांची देशभक्ती बाहेर आली होती. आता ही राष्ट्रभक्ती काय कपाटात बंद करून ठेवली आहे का? अजित डोवाल यांच्या मुलाची एक कंपनी असून, त्यात एक अरब तर एका पाकिस्तानी माणसाची भागीदारी आहे. हे भाजपला चालते;पण हे जर इतर कोणी केले असते तर त्याला राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही ठरवले असते. बालाकोटमध्ये भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये अडीचशे, तीनशे दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा करतात. हल्ला करायला गेलेल्या विमानाचे ते सहवैमानिक होते काय, असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला. लष्करातील जवानांपेक्षा व्यापारी हे जास्त साहसी असतात, असे बोलत असतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिपही त्यांनी यावेळी दाखविली.
लोकसभा निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात
2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून या पक्षाने आपली एक स्वतंत्र अशी वाट चोखाळली आहे. मनसेचा एक स्वतंत्र मतदारवर्ग आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला 15 लाख 3 हजार 863 मते तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 7 लाख 8 हजार मते मिळाली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपची हार हीच मनसेची जीत, असे मानून मनसेने 2019 ची लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवायला हवी, असा एक मतप्रवाह आहे. या मेळाव्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, राज यांनी लोकसभा निवडणुकीत मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे गूढ कायम ठेवले. मनसेसाठी इतर पक्षांकडे जागा मागत बसायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही, असा टोला लगावत लवकरच लोकसभा निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करेन, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.