पुतळ्यावर हजारो कोटी रुपये खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

Foto

सांजवार्ता ऑनलाईन

मुंबई – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी मोदी सरकारने 2290 कोटी रुपये खर्च केले आहेत. सरदार पटेलांच्या स्मारकाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. या पुतळ्यावर झालेल्या खर्चावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सरकारला फटकारले आहे. पुतळ्यांवर एवढा अवाढव्य खर्च करण्यापेक्षा आहे ती माणसं जगवली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पुतळ्यामुळे बाधित झालेल्या २२ गावातील नागरिकांनी मोदींचे अहमदाबादमध्ये स्वागत न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर तब्बल 2290 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी पटेलांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याचे अनावरण करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सरकारला फटकारले आहे. एका पुतळ्यावर झालेला एवढा खर्च पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनाही दुःख झाले असेल, असे या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. त्या ऐवजी देशातील लोकांना जगवण्यासाठी हा पैसा खर्च करता आला असता असे वल्लभभाईंच्या मनात आले असेल.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा २०१३ मध्ये त्यांनी या स्मारकाचे भूमिपुजन केले होते. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून सरदार सरोवरात पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभाण्यात आला आहे. मोदी बुधवारी भव्यदिव्य कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. या पुतळ्यासंबंधीची माहिती त्यांनी नुकतीच जपानमधील भारतीय नागरिकांसोबत संवाद साधताना दिली होती. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत असल्याचा पंतप्रधान मोदींना असलेला आनंद यातून दिसून आला. दुसरीकडे, या स्मारकामुळे 22 गावांचे प्रकल्पबाधित झाली आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहून आम्ही तुमचे स्वागत करणार नसल्याचे कळवले आहे. पत्रात म्हटले आहे,पंतप्रधान मोदी तुम्ही नको असलेल्या पाहुण्यांसारखे उद्या येथे याल. परंतू आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. आज सरदार पटेल असते तर या पुतळ्यासाठी धरण परिसरात झालेली तोडफोड पाहून त्यांना रडू कोसळले असते.

पुतळ्यासाठी धरण परिसरात मोठी तोडफोड करण्यात आली आहे. येथील जंगल, जमीन, पाणी, शेती ही आमच्या जगण्याचे साधन  आहे. तेच नष्ट करुन टाकण्यात आले आहे. तेव्हा तुम्ही करत असलेला उद्घाटन सोहळा हा आम्हाला आमचा मरण सोहळा वाटत असल्याचे, ग्रामस्थांनी लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.