छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात आणि रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने क्रांती चौक ते प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर ऑटो रिक्षा धडक मोर्चा काढण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात शेकडो रिक्षाचालक रिक्षांसह सहभागी झाले होते.
या वेळी आरटीओ कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. रॅपिडो बाईकच्या माध्यमातून सुरू असलेली विनापरवाना व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मोर्चाचे आयोजन राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे पाटील व
जिल्हा संघटक झाकीर पठाण यांनी केले होते. अशा अवैध वाहतुकीमुळे महिला व प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मनसेने स्पष्ट केले. या मोर्चात जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे, जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन नाईक, जिल्हा उपाध्यक्ष संकेत शेटे यांच्यासह पदाधिकारी राजेश रावलकर, प्रभू प्रधान, मोहम्मद फारूक, असलम शेख, राहुल तिनगोटे, पवन फतेसकर आणि जेम्स वंजारी आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रशासनाने या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून रिक्षा चालकांना न्याय द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे व जिल्हा संघटक झाकेर पठाण यांच्या वतीने देण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














