मनसेच्या नवसंकल्प मेळाव्याने मनसैनिकांत चैतन्य तरुणांची मोठी गर्दी : घोषणांनी दुमदुमला परिसर

Foto

 संघटन बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

 छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मेळावा आज  तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मनसेचा विजय असो, राज ठाकरे जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
 
पाच वर्षांनंतर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळावा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. विशेषतः मेळाव्याला जिल्हाभरातून आलेल्या तरुणांची मोठी गर्दी होती. प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसेचे नेते व माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क अध्यक्ष विनायक म्हशीलकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुल्हाटी आणि बिपीन नाईक, वैभव मिटकर, राहुल पाटील, मनीष जोगदंडे, राजीव जावळीकर, ऍड विनोद भाले,  महिला जिल्हाध्यक्ष ऍड. नूतन जैस्वाल, लीला राजपूत आदींची उपस्थिती होती. तसेच मनसेचे जिल्हा तसेच शहर पदाधिकारी उपस्थित होते. 

मेळाव्याचा प्रारंभी शाहीरी पथकाने शिवरायांचा पोवाडा सादर केला. पथकाने नृत्य कलेने सादर केलेल्या या आविष्काराने वातावरणात उत्साह निर्माण झाला. बाळ शिवाजीचा पाळणा आणि इतर शिव गीतांनी वातावरण भारावून गेले.  
या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकारी, सेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बाळा नांदगावकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन जनसंपर्क वाढवावा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी यावर नेते बाळा नांदगावकर हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी राजकीय वाटचाल, संघटन विस्तार आणि विविध सामाजिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विनायक म्हशीलकर यांनीही जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात विविध तालुका व विधानसभा स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. 

दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत संघटन विस्तार, पुढील दिशा आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. एकूणच नवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले असून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.