...आणि खासदार चंद्रकांत खैरे संतापले

Foto

औरंगाबाद – जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने खासदार चंद्रकांत खैरे संतापले. आठ-आठ दिवस आधी सूचना देऊनही अधिकारी हजर राहात नसतील तर बैठक घ्यायची तरी कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या बैठकीत खासदार खैरे यांनी रस्ता सुरक्षा समितीवरही ताशेरे ओढले.

रस्ता सुरक्षा समिती झोपली काय

जिल्ह्यामध्ये नवे रस्ते तयार झाले की अपघात वाढतात. चालक नियम धाब्यावर बसवून बेफाम वाहने चालवतात. अशा चालकांवर पोलिस कोणतीही कारवाई करत नाही, रस्ता सुरक्षा समितीचेही कायम दुर्लक्ष्य असते. यामुळे निरपराध नागरिकांचा हकनाक जीव जात आहे, याला जबाबदार कोण? असा सवाल खासदार खैरे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पौनित कौर, पोलिस उपायुक्त दिपाली घाडगे यांची उपस्थिती होती.

अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर

खासदार खैरे अध्यक्ष असलेल्या जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागासह इतरही अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर होते. या मुळे खासदार खैरे यांचा पारा चढला. आठ दिवस आधी सूचना देऊनही अधिकारी बैठकीला उपस्थित राहात नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा खासदार खैरे यांनी दिला. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण बैठकीला अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण खासदार खैरे यांनी विचारले मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

 वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

शहरातील पैठणरोडवर नुकत्याच झालेल्या अपघातात एका तरुण शिक्षकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन रस्ते तयार झाल्यानंतर वाहनचालक बेफाम वाहने चालवत असल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच रस्ता सुरक्षेकडेही कोणाचेही लक्ष नाही. अनेक ठिकाणी डिव्हायडर तोडून लोकांनी रस्ते धोकादायक बनवले आहेत. राँगसाईडने येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. शहरात भरधाव वेगाने आणि ट्रिपलसीट जाणारे दुचाकीस्वार  यामुळेही अपघातांची संख्या वाढली. रस्ते मोठे झाले तरी त्यांचा  उपयोग झालेला नाही, असे ताशेरे खासदार खैरे यांनी ओढले. पार्किंगच्या जागेमध्ये हातगाड्या आणि व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधत याविरोधात तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले.   रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून वाहतुकीचे नियम मोडणारे आणि पार्किंगचा गैरवापर करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले.