एमपीएससी पेपरफुटी प्रकरण, तत्कालीन प्रभारी अध्यक्ष संशयाच्या रडारवर, तरूणांमध्ये वाढता असंतोष, परिक्षेचे वेळापत्रकही बिघडले

Foto
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जानेवारी २०२६मध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण समोर आले असताना त्या कालावधीत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पेपरफुटीच्या वेळी आपण अध्यक्षपदावर नसल्याचे स्पष्ट केल्याने या संपूर्ण प्रकरणातील तत्कालीन प्रभारी अध्यक्षांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती अंतिम करून छपाईसाठी पाठवण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते. प्रश्नपत्रिका तयार करणार्‍या प्राध्यापकांची निवड, त्यांच्याकडून प्रश्नसंच मागवणे, त्यातील प्रश्नसंचाची निवड आणि अंतिम प्रश्नपत्रिका छपाईसाठी पाठवणे, या प्रत्येक टप्प्यावर आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीची जबाबदारी निश्चित करताना केवळ ती बाहेर कशी गेली, याचाच तपास न करता निर्मितीपासून छपाईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अभय वाघ यांचा कार्यकाळ कसा होता
डॉ. अभय वाघ हे आयोगाचे सदस्य असून २९ डिसेंबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. त्यामुळे पेपरफुटीच्या कालावधीत त्यांच्या कार्यकाळात प्रश्नपत्रिका निर्मिती, निवड आणि सुरक्षिततेसंदर्भात कोणते निर्णय झाले, कोणत्या अधिकार्‍यांची किंवा तज्ज्ञांची भूमिका या प्रक्रियेत होती, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. 

दरम्यान, पेपरफुटीच्या प्रकरणात विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी अधिकृत स्पष्टीकरण देत संबंधित कालावधीत आपण अध्यक्षपदावर नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटली त्या काळात अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती आणि प्रश्नपत्रिका निर्मितीची प्रक्रिया कोणाच्या देखरेखीखाली पार पडली, याकडे आता लक्ष लागले आहे.

कर्णिक यांच्यावर कारवाई झाली होती
एमपीएससीचे माजी अध्यक्ष शशिकांत कर्णिक यांना २००२ च्या बहुचर्चित एमपीएससी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली होती. मात्र, घोटाळा त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीच्या कालावधीत अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार सांभाळणार्‍या डॉ. अभय वाघ यांच्या कार्यकाळातील निर्णयप्रक्रियेचीही चौकशी का होऊ नये, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यभर आंदोलनाचा अभिजीत दिपके यांचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात राज्यातील मोठ्या शहरात परीक्षार्थी उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. सीबीडी बेलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. काही राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी लढा पुकारला आहे. आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके विद्यार्थी आंदोलनात उतरणार आहेत. त्यांनी याप्रकरणी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. दीपके यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यानुसार, एमपीएससीचा विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे सीजेपीचे वरिष्ठ नेते सौरभ दास हे सुद्धा नोएडा येथे पोहचतील. प्रशासनाकडे अक्षत नावाच्या विद्यार्थ्याला पाच लाखांची नोटीस बजावण्यात आली. त्याला ते भेटणार आहेत. पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे यांनी पीटीआयला माहिती दिली. त्यानुसार प्रथमेश देशमुख हा एमपीएससीची तयारी करत होता.