विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे....

Foto
 पुणे  : गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेलं एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर काल मध्यरात्री स्थगित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे आणि चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांकून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवले आहे.
 
एमपीएससीचं आंदोलन काल मध्यरात्री साधारण १.३० वाजता स्थगित करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळ रिकामे केले. यानंतर या ठिकाणी तैनात असणारे पोलीस देखील बंदोबस्त संपवून माघारी परतले. पोलीस माघारी जाताना विद्यार्थ्यांनी त्यांचं सॅल्यूट, टाळ्या आणि घोषणा देऊन कौतुक केले. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चोवीस तास चोख बंदोबस्त ठेवला. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि परिस्थिती शांततेत हाताळण्यासाठी पोलिसांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी तैनात असलेल्या पोलिसांचं कौतुक करण्यात आलं.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडूनही कौतुक
पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ गेल्या १२ दिवसांपासून स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन सुरू केले होते. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याचे कारण देत पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आणि आंदोलनाची परवानगी नाकारली, ज्यावरून काही आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेला संयम आणि बजावलेली चोख कामगिरी यांमुळे प्रशासनाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः मैदानात उतरून दिवसरात्र कर्तव्य बजावणार्‍या सर्व  जवानांचे आणि पोलीस कर्मचार्‍यांचे जाहीर कौतुक केले आहे. 

मान्य झालेल्या प्रमुख मागण्या मान्य....
आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
चौकशी होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर
भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकार्‍यांची चौकशी होणार
आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याचं आश्वासन 
तीन वर्षात ७० हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
२०२७ मध्ये होणार्‍या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
तहसिलदार भरतीत ६०-४० ऐवजी ५०-५० चा रेश्यो
आयोगाची सदस्य संख्या ११ पर्यंत वाढवली जाणार
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार
पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य