दंडाधिकार्‍यांना आला धमकीचा मेसेज; जामीन टाळण्यासाठीच बनाव रचल्याचा सीजेपीचा दावा, पुरावे देण्याची मागणी

Foto
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या जामीन सुनावणीदरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी करणार्‍या विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, या धमकीच्या नावाखाली आशुतोष रांका आणि सौरव दास यांची जामीन सुनावणी मुद्दाम लांबवली जात असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीने केला आहे.

गेल्या मंगळवारी बंदी असतानाही जंतर-मंतर बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आणि बुधवारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता, त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

कोर्टातील गोंधळ आणि धमकीचा आरोप
रविवारच्या सुनावणीदरम्यान दंडाधिकार्‍यांच्या बाजूने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान आपल्याला जीवे मारण्याचा धमकी मिळाल्याचे दंडाधिकार्‍यांनी सांगितले. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र ही धमकी कोणी आणि का दिली, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सीजेपीचा प्रशासनावर गंभीर आरोप
सीजेपीच्या रत्ना सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे सर्व नाटक असल्याचे म्हटलं. रत्ना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी ११ वाजेपासून पोलीस ठाण्यात होत्या. सुनावणी दुपारी १२ वाजता होणार होती, पण सहाय्यक पोलीस आयुक्त आणि दंडाधिकारी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात आले नाहीत.

तातडीने जामिनावर सुनावणी नाकारली
दंडाधिकारी ५ वाजण्याच्या सुमारास आले आणि त्यांनी जामिनावर सुनावणी घेण्याऐवजी इतर विधाने करण्यास सुरुवात केली. तसेच ४ जामीनदारांची हमी नसल्याचे कारण ते जामीन फेटाळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

सरकारी वकिलांची भूमिका
गेल्या ४ दिवसांपासून नसलेले सरकारी वकील सोमवारी अचानक हजर झाले. सुनावणी सुरू झाल्यावर ५ मिनिटांत दंडाधिकार्‍यांनी धमकीचा मेसेज आल्याचे सांगून मूळ प्रकरणावरून लक्ष भरकटवले, असा दावा सीजेपीने केला आहे. जर दंडाधिकार्‍यांना धमकी आली असेल, तर त्यांनी त्याविरोधात नक्कीच कडक कारवाई करावी, त्या व्यक्तीचा नंबर आणि नाव द्यावे. पण या धमकीच्या कारणावरून आमच्या लोकांच्या सुनावणीत अडथळा का आणला जात आहे? असा सवाल रत्ना सिंह यांनी केला.