छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भीम टेकडी येथे सुरू असलेल्या जागतिक धम्म परिषदेचा दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. उद्घाटन सोहळ्यात भिक्खूनी धम्मदर्शना महाथेंरी,भन्ते हर्षबोधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार कल्याण काळे , डॉ. अरविंद गायकवाड, अनिलकुमार बस्ते, मिलिंद शेळके, बाबुराव कदम, विजय मगरे, किशोर थोरात, तसेच उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार कल्याण काळे म्हणाले की, मी खासदार झालो ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळेच, असे सांगत भीमटेकडीच्या विकासासाठी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भाषणात भीम टेकडीच्या विकासासाठी खासदार निधीतून टप्प्याटप्प्याने ७५ लाख रुपये देण्याची घोषणा केली.
३० देशांतील भन्तेजींची उपस्थिती या परिषदेस ३० देशांतील भन्तेजी सहभागी झाले आहेत. समता आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचविण्याची ही संधी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवाय हा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. भीम टेकडी येथे भविष्यात ५० एकरात भव्य दिव्य स्मारक उभे राहावे , अशी इच्छाही व्यक्त करण्यात आली. तसेच ही जमीन संस्थेच्या नावावर करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.












