नवोदय परीक्षा प्रकरणी महालगाव गुरुकुलचे कर्मचारी दोषी

Foto
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तालुक्यांतील विद्यार्थ्यांची फसवणूक

वैजापूर, (प्रतिनिधी): नवोदय परीक्षेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी तालुक्यातील महालगाव येथील गुरुकुल शाळेचे कर्मचारी दोषी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशी अहवाल पुढील कारवाईसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

१३ डिसेंबर २०२५ रोजी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाची तालुक्यात परीक्षा झाली होती. या परीक्षेस २११६ विद्यार्थी बसले होते. तर महालगाव येथील गुरुकुल विद्यालयाचे ८ विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहीले होते. या विद्यार्थ्यांकडे बनावट हॉल तिकीट आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली होती. यातील काही विद्यार्थ्यांना तीन सारखे क्रमांक मिळाले. तर काही विद्यार्थ्यांना दोन सारखे क्रमांक मिळाले होते. त्यामुळे हे विद्यार्थी
परीक्षेपासून वंचित राहीले. 

या विद्यार्थ्यांमध्ये वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील गुरुकुल विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील सेंट फ्रान्सिस या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नवोदयच्या भरारी पथकाने वैजापूर व छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली.
त्यांनी संबंधित हॉल तिकीट ताब्यात घेतले. 

या हॉल तिकीटाची नवोदय विद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पंधरा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बनावट असल्याचे दिसून आले. या सर्व विद्याथ्यांचे परीक्षेसाठी फॉर्म देखील भरण्यात आले नव्हते. त्यांना बनावट हॉल तिकीट देवून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांची नियुक्ती करण्यात आली होती.