छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील व वीजवाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे वेगाने सुरू आहेत.
पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी व विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे प्रामुख्याने दर शुक्रवारी करण्यात येत आहेत. महापारेषण व महावितरणच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ङ्गएसएमएसफ्द्वारे संबंधित वीजग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंद होण्याबाबत कळवण्यात येत आहे.
पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे आदी कामे करण्यात येत आहेत.
महावितरणने शुक्रवारी (दि.१०) विविध ३३ केव्ही उपकेंद्रांत व त्यावरील वाहिन्यांवर नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली.
खाजगी किंवा विविध संस्था मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन वीजवाहिन्यांना संभाव्य धोका असणाऱ्या झाडांच्या मोठ्या फाद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या साह्याने छाटणी करावी. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे महावितरणकडून कळवण्यात आले आहे.














