प्रा. लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : निवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड आणि करण आडे यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे लोंढे यांचा मोबाईल पुण्यात नेऊन पुरावा नष्ट करणारा आरोपी अक्षय रोटे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २८ मार्चपर्यंत वाढ केली आहे. 
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. लोंढे यांची ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान डोक्यात गोळी झाडून हत्या करून विशालने त्यांचा मृतदेह गेवराई तांडा येथील डोंगरात पुरला होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी मृताचा मोबाईल स्वतःकडे ठेवला आणि बनाव रचला.
विशाल राठोडचा तोरा कायम
सोशल मीडियावर रील स्टार म्हणून मिरवणारा मुख्य आरोपी विशाल राठोड याचा तोरा ११ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतरही तसाच असल्याचे दिसून आले. न्यायालयात हजर करताना त्याच्या चेहर्‍यावर कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान त्याला पाहण्यासाठी त्याच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती, मात्र विशाल प्रचंड तोर्‍यात वावरताना दिसून आला.
मुठा नदीत फेकला मोबाईल
स्टेटस अपडेट केल्यानंतर अक्षयने आपल्या मावस भावाच्या मदतीने तो मोबाईल पुण्याच्या मुठा नदीच्या पात्रात फेकून दिला. सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या पथकाने स्थानिक अग्निशमन दल आणि ६ स्विमर्सच्या मदतीने नदीत मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तो हाती लागलेला नाही. मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अक्षयच्या मावस भावाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अक्षयच्या कोठडीची मागणी केली होती.