मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील स्पर्धा परीक्षा देणार्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेअंतर्गत ङ्गलिपिक-टंकलेखकफ आणि ङ्गकर सहाय्यकफ पदांसाठी आयोगाकडून स्वतंत्रपणे घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २० मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावी लागत होती. आता ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
काय आहे नवीन नियम?
नव्या नियमानुसार, उमेदवारांना आता केवळ पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून कोणतीही स्वतंत्र टंकलेखन चाचणी घेतली जाणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाणार आहे.
टंकलेखन प्रमाणपत्र अनिवार्यच राहणार
टंकलेखन चाचणी रद्द करण्यात आली असली तरी उमेदवारांकडे सरकारमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहणार आहे. अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवारांकडे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
प्रमाणपत्रांची पडताळणी सरकारकडून नवीन नियमानुसार, मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम शिफारस यादी थेट सरकारकडे पाठवली जाईल. त्यानंतर नियुक्ती प्राधिकरणामार्फत उमेदवारांच्या मूळ टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
परीक्षा प्रक्रिया अधिक जलद होणार
आयोगाचे सचिव महेंद्र हरपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलामुळे निवड प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि जलद होणार आहे. मुख्य परीक्षेनंतर स्वतंत्र चाचणी घेण्याची गरज नसल्याने निकाल जाहीर होण्यास होणारा विलंबही टळणार आहे.
गट-क मुख्य परीक्षा २०२५ साठीही नियम लागू
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मुख्य परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जून आहे. आयोगाने घेतलेला हा नवीन निर्णय गट-क मुख्य परीक्षा २०२५ साठीही लागू असणार आहे. त्यामुळे या परीक्षेला बसणार्या हजारो विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेनंतर स्वतंत्र टंकलेखन चाचणीला सामोरे जावे लागणार नाही.