पुणे : पुण्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने पुण्यातील १२ आस्थापनांवर छापे टाकत ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याप्रकरणी १४ ठिकाणी कारवाई करून सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा एफडीएने जप्त केला आहे. तर या जप्त साठ्याचे नमुने तपासासाठी घेतले असून या संदर्भातील अहवाल आल्यानंतर कारवाईची दिशा ठरेलं, अशी माहिती एफडीएने दिली आहे.
दरम्यान, या पूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून ४ ट्रक पनीर-खवा जप्त केले होते. त्यानंतर एफडीए पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये आल्याचे दिसून आलं आहे. पुणे विभागात १० ते १५ सप्टेंबरदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याप्रकरणी १४ ठिकाणी कारवाई करून सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा एफडीएने जप्त केला आहे. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही सध्या तपासणी केली जात असून सणासुदीच्या काळात खवा, मावा, स्वीट, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांची मागणी वाढते, या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी लेबल, उत्पादनाची तारीख आणि इतर माहिती तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेनी कारवाईचा धडाका लावल्यानं सर्व सामान्य जनतेत अन्न पदार्थाच्या बाबतीत कमालीची जनजागृती निर्माण झालीये. परिणामी ऐन गणेशोत्सवात दहा हजार केटरर्सना तीस टक्के फटका बसलाय. त्यामुळं आता केटरर्स जागे झालेत. एफडीएची कारवाई टाळण्याचं? ग्राहकांमध्ये विश्वास टिकवण्याचं? आव्हान केटरर्सनी स्वीकारलंय. यासाठी केटरर्सनी थेट एफडीए समोरचं तज्ञांकडून प्रशिक्षण घेतलंय. यामध्ये भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं? पनीर बनावट तर नाही ना? हे कसं तपासायचं? याचे धडे केटरर्सनी घेतलेत. आपली उपजीविका टिकवण्यासाठी आता केटरर्सनी बदल स्वीकारायला सुरुवात केलीये. याचा आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.