भिवंडी : भिवंडी शहरात नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथील कोहिनूर इमारतीचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अनेकजण ढिगार्याखाली अडकले आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारपोलीतील भंडारी कंपाऊंडमधील चार मजली कोहिनूर इमारत गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगार्याखाली अडकल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले की, भिवंडीत इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून, बचावलेल्या नागरिकांची गायत्री मंदिर-गीता हॉल येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीत सहा ते सात कामगार अडकल्याची माहिती मिळाली असून, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची पथके संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत.
या चार मजली इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या होत्या. महापालिकेने यापूर्वीच मकॅटेगरी-सीफ अर्थात धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती. त्यामुळे बहुतांश रहिवाशांनी इमारत रिकामी केली. मात्र, एका कुटुंबाकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि कामगारांसह त्या कुटुंबातील सदस्य मलब्याखाली अडकले.