अमरावती जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई , शस्त्रांसह 11 जणांना बेड्या

Foto
अमरावती : अमरावतीच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यात 11 जण शस्त्रांसह पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत रात्री (2 ऑक्टॉबर) दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. यात पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी येथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील 5 अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस व ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

तर, दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 6 जणांना शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी कश्यप पेट्रोल पंपाजवळ आणि ब्राह्मण सभा कॉलनीत संशयितांकडून पोलिसांवर फायरिंग झाल्याची चर्चा आहे. पोलीसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना शस्त्रांसह अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड (ATS) आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करत आहेत.

राजकीय कार्यकर्त्याच्याही सहभाग ?

दरम्यान, या घटनांमुळे परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या घराचा यात संबंध असल्याने चर्चांना उधाण आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र काल दसऱ्याच्या दिवशी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.