नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत आता आमुलाग्र बदलाची नांदी दिसून येत आहे. भाजप काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक वेगळा प्रयोग राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नवीन सचिवांची निवड करण्यासाठी मुलाखतीचा मार्ग निवडला आहे. राहुल गांधी आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी थेट उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
सोमवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यात संभाव्य ३०-४० उमेदवारांचे गट तयार करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात आली. त्यांचे वन टू वन इंटरव्ह्यू घेण्यात आला. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ पदांच्या निवडीसाठी अशा प्रकारे मुलाखत कार्यक्रम पार पडला. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशासह इतर राज्यातील १०० हून अधिक संभाव्य उमेदवारांनी त्यासाठी हजेरी लावली. या मुलाखत प्रक्रियेत १२० सचिव नियुक्त करण्यात येणार आहे.
ज्येष्ठता नाही, कामगिरीवर फोकस
ड्रॉईंग रूम पॉलिटिक्स नेत्यांच्या जबर पकडीतून पक्ष सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी हे मोठे पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. पक्षासाठी रस्त्यावर उतरणारे, आक्रमक आणि मुद्देसुद भूमिका मांडणार्या तरुणांना या मुलाखतीत अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी शिफारशींचा जुना फॉर्म्युला बदलला आहे. त्यांनी जुन्या नेत्यांऐवजी धडाडीच्या नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. राजकीय नेत्यांचा गाऊंड परफॉर्मन्स, पक्षासाठी केलेले कार्य, सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवरील त्याची पकड या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.
बहुजन वर्गातील तरुणाईला संधी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपूर्वी ६ राज्यांचे प्रभारी बदलले. निष्ठावंतांना बढती दिली. त्यानंतर मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या सचिवांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि खुल्या वर्गातील नेत्यांना, तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण ठरवले गेले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान युवक काँग्रेस आणि एनएसयूआय मध्ये जबरदस्त कामगिरी बजावणार्या उमद्या नेतृत्वाला पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विविध राज्यातील निवडणुकीपूर्वी हा बदल करण्यात आला आहे.
मुंबई काँग्रेसमधील ७७ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची केली हकालपट्टी
दरम्यान गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत झालेल्या काँग्रेस पक्षातील बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवायांविरोधात कठोर पाऊल उचलत ७७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढविणे, बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे आणि पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे, या कारणांवरून मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.
पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करूनही काही जणांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईवरून काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षातून आधीच राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या काही नेत्यांचाही कारवाईच्या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्ष सोडलेल्या व्यक्तींवर निलंबन किंवा हकालपट्टीची कारवाई करण्याचा नेमका आधार काय?, असा सवाल काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.