मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईतील मंत्रालयाजवळील बंगल्याला आज भीषण आग लागली. पावनगड नावाच्या या बंगल्याला लागलेल्या आगीत बंगल्यातील साहित्य जळून मोठं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश नाईक यांच्या मंत्रालयाजवळ असलेल्या या बंगल्याला एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. बघता बघता ही आग घरभर पसरली. तसेच बंगल्यातून धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागले. आग लागल्याचं वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, सध्या दिवाळीचे दिवस असल्याने गणेश नाईक हे या बंगल्यात उपस्थित नव्हते. तसेच काही कार्यालयीन कर्मचारी वगळता बंगल्यातील वर्दळही कमी होती.