छत्रपती संभाजीनगर : शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना अशोक खरातला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कल्पना खरातने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तपासातील गंभीर पुरावे पाहता फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आता तिची पोलीस कोठडीत चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या खटल्यातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने आरोपींकडून ३ कोटी रुपये २ टक्के मासिक व्याजाने कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जाच्या हमीपोटी आरोपींनी फिर्यादीच्या शेतीचे खरेदीखत कल्पना खरातच्या नावाने लिहून घेतले होते. पुढे फिर्यादीने घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे परत केली. मात्र, पैसे परत मिळूनही आरोपींनी फिर्यादीची जमीन त्याच्या नावे परत करण्यास साफ नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली होती.
केवळ पत्नी असल्याने गोवले; कल्पना खरातचा अजब दावा
अटकेच्या भीतीने कल्पना खरातने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयात युक्तिवाद करताना कल्पना खरातने दावा केला की, या संपूर्ण आर्थिक व्यवहारात माझा कोणताही थेट सहभाग नव्हता. मी केवळ मुख्य आरोपीची पत्नी असल्याने मला या गुन्ह्यात गोवण्यात आले.
बँक खात्यातील नोंदी अन् स्वाक्षर्यांमुळे बिंग फुटले
कल्पना खरातचा हा दावा खोडून काढण्यासाठी सरकारी पक्षाने तपासादरम्यान गोळा केलेले महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की, फिर्यादीच्या जमिनीच्या खरेदीखतावर खुद्द कल्पना खरातच्या स्वाक्षर्या आहेत. एवढेच नव्हे तर, तिच्या बँक खात्यातील व्यवहारांच्या नोंदींवरून तिला या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहाराची पूर्ण माहिती असल्याचे आणि तिचा यात सहभाग असल्याचे स्पष्ट पूरक पुरावे तपासात आढळले आहेत.
दिशाभूल केल्याबद्दल न्यायालयाचे कडक ताशेरे
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरातच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, अर्जदार महिलेने आपल्याला या व्यवहाराची माहिती नसल्याचा केलेला दावा प्रथमदर्शनी पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येत आहे. तिने स्वतःचा गुन्ह्याशी संबंध लपवण्यासाठी आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी अनेक महत्त्वाची तथ्ये जाणीवपूर्वक दडपली आहेत.
खरेदीखतावरील स्वाक्षर्या आणि बँक खात्यातील व्यवहार हे कल्पना खरातचा गुन्ह्यातील प्राथमिक संबंध दर्शवण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याची सखोल पाळेमुळे खणून काढण्यासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.