नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा २०२२ सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने बंडखोरी रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची एकनिष्ठता तपासण्यासाठी आज दिल्लीत बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. थ्री-लाइन व्हिप जारी करूनही सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला संजय राऊतांसह केवळ ३ खासदार उपस्थित राहिले आहेत, तर उर्वरित ६ बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे साफ पाठ फिरवली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पक्षातील संभाव्य बंडखोरी मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिल्लीतील जुन्या संसद भवनात ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. खासदारांची अधिकृत उपस्थिती नोंदवण्यासाठी स्वतंत्र कॉपी (उपस्थिती पुस्तक) तयार करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला केवळ खालील प्रमुख नेते आणि खासदारच पोहोचू शकले आहेत.
संजय राऊत (राज्यसभा खासदार), अनिल देसाई (मुख्य प्रतोद), अरविंद सावंत (लोकसभेतील गटनेते), राजाभाऊ वाजे (नाशिकचे खासदार) या ३ लोकसभा खासदारांव्यतिरिक्त इतर ६ खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटाची धाकधूक कमालीची वाढली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत आणि अरविंद सावंत हे पुढील रणनीतीसाठी संसदेच्या दिशेने रवाना झाले आहेत.
बंडखोर खासदारांकडून व्हिपचे उल्लंघन; अपात्रतेची टांगती तलवार?
ठाकरे गटाच्या ९ लोकसभा खासदारांपैकी ६ बंडखोर खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी संपर्क साधला असून स्वतंत्र गटाची मान्यता मागितली आहे. या बंडखोरांना कायदेशीर कचाट्यात पकडण्यासाठी ठाकरे गटाने सर्व ९ खासदारांना थ्री-लाइन व्हिप जारी करून वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे कडक आदेश दिले होते. आता या व्हिपचे उल्लंघन करून ६ खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे ठाकरे गट त्यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई करण्याची कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे. मात्र, बंडखोर खासदार अद्याप समोर आले नसून ते अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
कायदेशीर अडचण काय?
लोकसभेत शिवसेनाकडे एकूण ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळून वेगळा गट स्थापन करण्यासाठी २/३ म्हणजेच किमान ७ खासदारांची आवश्यकता आहे. शिंदे गटाकडे सुरुवातीला ६ खासदार असल्याचा दावा होता (जो आधीच ७ पेक्षा कमी होता). त्यातही आता २ खासदारांनी मागण्या पूर्ण न झाल्याने पत्रावर स्वाक्षर्या करण्यास नकार दिला आहे. सध्या सह्या करणारे चारही खासदार नॉट रिचेबल असून ठाकरे गट त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, संख्याबळ ७ पेक्षा खूपच कमी असल्याने तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या हे ऑपरेशन पूर्णपणे फसण्याच्या मार्गावर आहे.
फक्त ४ खासदारांच्या स्वाक्षर्या?
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर गटाने लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या पत्रात मोठा घोळ समोर आला आहे. ६ खासदार सोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात केवळ ४ खासदारांनीच त्या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.