पुणे : संपूर्ण देशात खळबळ उडवणार्या नीट पेपरफुटी प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमधील नामांकित कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आले आहेत. मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
तब्बल ८ ते ९ तास चौकशी
लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात सर्वश्रुत आहे. याच लातूरमधील पेपरफुटीच्या कनेक्शनचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल २८ अधिकार्यांचे पथक दाखल झाले होते. या पथकानं शिवराज मोटेगावकर यांची तब्बल ८ ते १० तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान पाहिजे तसं उत्तरं न मिळाल्यानं आणि संशयास्पद बाबी आढळल्यानं अखेर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे.
पी.व्ही कुलकर्णींमुळे मोटेगावकरांपर्यंत पोहोचले
मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं? याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून लातूरमधीलच पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार सीबीआयने लातूरमध्ये चके फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.
पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये
देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्या च्या एका विशेष पथकाने शनिवारी नांदेडमध्ये धडक कारवाई केली. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्या विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकत सीबीआयने तब्बल ७ ते ८ तास कसून चौकशी केली. धक्कादायक म्हणजे सदर कुटुंबीय आपल्या मुलीसाठी लाखो रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. याच संशयावरुन सीबीआयच्या पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.