के.ई.एम. कडून मोठी कारवाई, डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले

Foto
मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कॉमेडी-शो दरम्यान मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ.सेजल पवार हिला पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय के.ई.एम. प्रशासनानं घेतला आहे. या 15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.  आज सेजल पवारच्या पालकांशी वरिष्ठांनी चर्चा केली असून त्यानंतर सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

के.ई.एम. कडून समिती स्थापन
के.ई.एम. प्रशासनाकडून सेजल पवार प्रकरणात सखोल चौकशीची गरज असून त्यासाठी पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. सात दिवसात समिती आपला अहवाल सोपवणार त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट  करण्यात आलं आहे. डॉ. सेजल पवार हिला चौकशी समितीसमोर   तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

डॉ. सेजल पवार हिच्या व्हिडिओतील विधानांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणाम यासाठीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच सदस्यांच्या समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे.  या समितीच्या कार्यकक्षेत कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल. 

प्राथमिक अहवालात काही आरोपांबाबत तथ्ये समोर आली असली, तरी सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याने विस्तृत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, विद्यार्थिनीचे वर्तन, संस्थेची प्रतिमा आणि संबंधित तक्रारी या सर्व बाबींचा चौकशीत समावेश असणार आहे.

डॉ. सेजल पवार 15 दिवस सक्तीच्या रजेवर
डॉ. सेजल पवार हिला के.ई.एम. प्रशासनानं15 दिवसांसाठी कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव केला आहे. तिला या कालावधीत कॉलेजमध्ये येता येणार नाही, क्लासेसला हजर राहता येणार नाही.  आज सेजल पवारला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सेजल पवारला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

कॉमेडी शो दरम्यान मृतदेहासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ. सेजल पवारने KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला होता.डॉ. सेजल पवार हिने मागील वर्षी इन्स्टाग्राम रीलमध्ये केईएम रुग्णालयाला चिंदी कॉलेज म्हणत केईएम महाविद्यालयाचा अवमान केला होता. या प्रकरणी तिने माफी मागितली होती.त्यानंतर तिच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यानंतर पुन्हा एकदा प्रणित मोरेच्या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तिच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.