भारतीय जहाजावर ओमान किनारपट्टीजवळ मोठा हल्ला; केंद्र सरकारकडून निषेध

Foto
नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनीवरून गेल्या काही दिवसांपासून संघर्षाच्या ठिणग्या पडत असून, आता भारतीय जहाजावरच हल्ला करण्यात आला आहे. जीएफएस गॅलेक्सी या जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. या जहाजावर ११ भारतीय होते, त्यापैकी १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर १ जण बेपत्ता आहे. दरम्यान भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओमान किनारपट्टीजवळ 'जीएफएस गॅलेक्सी'या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. 

एका भारतीयाचा शोध सुरूच
परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जहाजावर असलेल्या ११ भारतीय नागरिकांपैकी १० जणांना वाचवण्यात आले आहे, तर एक भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ओमानच्या किनारपट्टीवर व्यावसायिक जहाज 'जीएफएस गॅलेक्सी'ला लक्ष्य करून झालेल्या या हल्ल्यानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जहाजावरील ११ भारतीयांपैकी १० जणांना सुरक्षित वाचवण्यात आले, परंतु एका बेपत्ता भारतीयाचा शोध अजूनही सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेत ओमानच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने समन्वय साधत आहे. या संकट काळात सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तणाव कमी करायला हवा, भारताचे आवाहन
होर्मुझ सामुद्रधुनी आणि तिला लागून असलेल्या भागात व्यावारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत असल्याबद्दल मंत्रालयाने आपल्या निवेदनात तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे. 
वाढलेला तणाव त्वरित कमी केला पाहिजे, असा पुनरुच्चार भारत सरकारने जागतिक व्यासपीठावर केला आहे.त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांना एखाद्या तर्कसंगत आणि शांततापूर्ण तोडग्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण भागात पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल, असे आवाहनही भारताने केले आहे. 

जहाजे आणि ठिकाणांवर हल्ले करणे थांबलेच पाहिजे
भारताने म्हटले आहे की, या भागातील व्यापारी, तेल जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची ही मालिका आता कोणत्याही परिस्थितीत थांबलीच पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तत्त्वांना अनुसरून, सर्व आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून मुक्त आणि विनाअडथळा जल वाहतूक तसेच व्यावसायिक कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ववत केले पाहिजेत, जेणेकरून जागतिक व्यापार सुरक्षितपणे सुरू राहू शकेल.