एकुलत्या एक मुलाचं अख्खं कुटुंब संपलं, घरी वाट पाहत राहिले वृद्ध आई-वडील, बर्कलेज कंपनीच्या उपाध्यक्षाचा अपघातात मृत्यू

Foto
हरदोई :   देशभरात सर्वत्र काल भाऊ बहिणीचा आवडता सण म्हणजेच भाऊबीज साजरी केली गेली. मात्र एकीकडे आनंदी वातावरण असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील एका कुटुंबावर सणाच्या दिवशी काळाने घाला घातला. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात गंगा एक्स्प्रेसवेवर भाऊबीजेला निघालेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघात झाला. या दुर्घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील शिवम उपाध्याय हे पत्नी मेनका उपाध्याय आणि दोन मुलांसह नोएडा येथून प्रयागराजला जात होते. ते बर्कले नकपंनीचे उपाध्यक्ष होते . गंगा एक्स्प्रेसवेवरील सांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटौली गावाजवळ त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात शिवम आणि मेनका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सात वर्षांचा मुलगा व्योम गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा शिवांग यालाही गंभीर अवस्थेत हरदोई येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यालाही मृत घोषित केले. त्यामुळे या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच बिलग्राम, सांडी आणि मल्लावां पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एक्सप्रेस-वेवरील कर्मचार्‍यांनीही बचावकार्यात मदत केली. अपघातानंतर कार सुमारे ३० मीटरपर्यंत डिव्हायडरवर घासत गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिवम हे नोएडा येथे नोकरी करत होते. भाऊबीजेच्या निमित्ताने ते पत्नी आणि मुलांसह प्रयागराजला निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.  मयत शिवम उपाध्याय त्यांच्या आई वडिलांडिलांचे एकुलते एक पुत्र होते. घरी वृद्ध आई वडील त्यांची वाट पाहत बसलेले असतानाच हा भीषण अपघात झाला.