अशोक खरातकडे जाणाऱ्या सगळ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, त्याशिवाय भोंदुगिरी संपणार नाही : संजय राऊत

Foto
मुंबई : स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात यास महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या. खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह इतर सर्वच क्षेत्रातील मातब्बरांचा राबता होता. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी अशोक खरातच्या दरबारात जे सत्ताधारी जात होते त्यांना सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. तसंच अशोक खरातवर पहिला गुन्हा 2003 आणि दुसरा 2005 मध्ये दाखल झाला होता असंही म्हटलं आहे.

महाराष्ट्र हा खूप पूर्वीपासून पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात बुवाबाजी आणि भोंदुगिरी फोफावत असेल तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्यांना मंत्र्यांना सहआरोपी केलं पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदुगिरी थांबणार नाही. जे कुणी यातून पळवाट काढत आहेत ते खोटं बोलत आहेत. या प्रकारचा पहिला गुन्हा अशोक खरातवर 2003 मधे दाखल झाला आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

खरातबाबत 2003 आणि 2005 मध्येही गुन्हे दाखल झाले आहेत-राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले, नाशिकमधल्या एका वृत्तपत्रात खरातच्या कारनाम्यांबाबत लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. 2003 आणि 2005 या दोन्ही वर्षांत गुन्हे दाखल झाले आहेत तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अशोक खरातकडे जात असतील आणि पूजाविधी करत असतील, जादूटोणा करत असतील तर या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सक्षम पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे जो मुख्य आरोपी पकडला आहे त्याचा जबाब नोंदवून घेतला जातो आहे. कुठलीही मोठी नावं आली तरीही ती दडपली जाणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले.

दीपक केसरकरांवर विश्‍वास ठेवू नका-राऊत
दीपक केसरकर आरोप फेटाळत असतील तरीही त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवू नका. ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्यांच्यापैकी एक गट एकत्र झाला आणि बाहेर पडला असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे. सुनेत्रा पवारांना जर वाटत असेल आणि अजितदादांचा विचाराने त्या चालत असतील तर रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हटवलं पाहिजे. हा निर्णय सुनेत्रा पवारांनी तातडीने घेतला पाहिजे. कुणाची वाट बघत आहेत त्या? चाकणकरांना हटवण्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, तो त्यांचा निर्णय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.