महापालिकेत पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार, मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांचे वक्तव्य

Foto
मालेगाव : टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणे चुकीचे नसल्याचा दावा मालेगावचे उपमहापौर शान ए हिंद यांनी केला आहे. मालेगाव उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली. सध्या उपमहापौर दालनात दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असेही शान ए हिंद यांनी स्पष्ट केले. कार्यालयात हा फोटो लावण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान यांच्या नावावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. काल (१५ फेब्रुवारी) पुण्यात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमनेसामने संघर्ष झाला. या वेळी सौम्य दगडफेकही झाली, ज्यामध्ये काही कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले असून, टिपू सुलतान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धीन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य महान असून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे पराक्रमी योद्धे होते. त्यांनी कधीही विषारी किंवा विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे प्रतीक म्हणून टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे.